अहमदनगर प्रतिनिधी | राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी कोणताही ताळमेळ नसून हे सरकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली. येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गिरीश महाजन आज अहमदनगर जिल्हा दौर्यावर होते. या अनुषंगाने नगर येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये एवढ्या चौकशा सुरु आहेत की भ्रष्टाचाराला लिमिटच राहिलेलं नाही. कायदा सुव्यवस्था कुठेच राहिली नसून राज्यात काय चाललंय याची कल्पना करू शकता. हे तीन पक्षाचं सरकार आहे. मात्र कोनामध्येही एकमत नाहीये. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. तरीही कारवाई केली जात नाही. हा या सारकामध्ये निर्लज्जपणाचा कळस आहे. बदल्यांमध्ये पैसे घ्यायचे याच्या व्यतिरिक्त सरकारला काम नसल्याची टीका महाजन यांनी केले.
आमदार महाजन पुढे म्हणाले की, सरकारमुळेच एसटीचा संप चिघळला आहे. आमच्या सरकारच्या काळात मोर्च्यांनी रेकॉर्ड मोडले. मात्र आम्ही प्रत्येक मोर्चाला स्वतःहून सामोरे जायचो. या सर्वाचा मी साक्षीदार आहे. मात्र या सरकारमध्ये कोणी कोणाची दखल घेत नाही. तुम्ही मोर्चा काढा उपोषणाला बसा किंवा मरा; या सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही. एसटी कर्मचार्यांच्या मोर्चाला मंत्री जाऊन भेटले असते तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता, असे गिरीश महाजन म्हणाले.