नवी दिल्ली, वृत्तसंस्था | पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेले हाडवैर सध्या मागे पडल्याचे दिसत आहे. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गाठीभेटींमुळे हे वातावरण बदलल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच या दोन नेत्यांची भेट घेतली. मोदी व शहांच्या भेटीदरम्यान हसत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तृणमूल-भाजपमधील कटूता कशी काय संपलीय?, यामागे काय कारण आहे ?, असे विचारले जात आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आसाममधील एनआरसीप्रकरणी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली. एनआरसी यादीतून खूप पात्र लोक वगळण्यात आले आहेत. त्यासंदर्भात गृहमंत्र्यांशी चर्चा केली. आसाममधील नागरिकांना भेडसावत असलेली चिंता गृहमंत्र्यांसमोर बोलून दाखवली असून त्यांनीही ती लक्षपूर्वक ऐकून घेतल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली.
आसाममधील १९ लाख लोक एनआरसीमधून वगळण्यात आले आहेत. यात असंख्य बंगाली भाषिक आहेत. तसेच काही हिंदी आणि गोरखा आहेत. जे अधिकृत आहेत, अशा लोकांना एनआरसीमधून वगळण्यात आले आहे. बंगालमधील एनआरसीवर कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये याची कोणतीही गरज नाही. गृहमंत्र्यांनी मी जे सांगितले, ते लक्षपूर्वक ऐकलेय, असेही ममता यावेळी म्हणाल्या.