नवी दिल्ली-वृत्तसेवा | भाजपच्या विरोधात तयार झालेल्या इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली आहे. या बैठकीतील महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्या या प्रस्तावाला पचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीलास यांनी पाठिंबा दर्शवला.
विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या पंतप्रधान चेहऱ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रस्तावाला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावावर खर्गे म्हणाले की, आपण निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सर्वजण मिळून काम करतील आणि ज्या राज्यात आमची माणसे आहेत, तिथे जागावाटपाच्या बाबतीत एकमेकांशी तडजोड करतील. ते करता येत नसेल तर इंडिया आघाडीचे लोक ठरवतील असे खर्गे म्हणाले.
आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांनी ममता बॅनर्जींच्या प्रस्तावाबाबत सांगितले की, मी त्याची पुष्टी करू शकत नाही. मी हो म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही, असे जयंत चौधरी म्हणाले. नवी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूकडून राजीव रंजन सिंह, तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. डीएमके कडून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, शिवसेना (उद्धव गट) कडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबुबा मुफ्ती, अपना दल (के) कडून कृष्णा पटेल आणि पल्लवी पटेल आणि इतर अनेक नेते सहभागी झाले होते.