भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शापीत रस्ता म्हणून ओळखला जाणारा मामाजी टॉकीज रोड हा मोठ्या नवसाने तयार झाला खरा, मात्र सहा महिन्यातच याची दुर्दशा झाली असून मुख्याधिकार्यांनी नोटीस बजावल्याने धाबे दणाणलेल्या ठेकेदारांनी याचे काम सुरू केले आहे. अर्थात, ही मलमपट्टी अजून किती दिवस टिकेल याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त चर्चा सुरू आहे.
टक्केवारीतील हिश्श्याचा वाद
भुसावळ शहरातील दगडी पुलापासून ते जुना सातारा चौकापर्यंतचा मामाजी टॉकीज समोरून जाणारा रोड हा गेल्या अनेक वर्षांपासून तयार करण्यात आला नव्हता. यामुळे यावरून जाणारे हजारो नागरिक नगरपालिका पदाधिकार्यांचा उध्दार करत आपला संताप व्यक्त करत होते. २०१६ च्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून लोकनियुक्त नगराध्यक्षपद मिळाल्याने तरी हा रस्ता होईल अशी अपेक्षा होती. मात्र टक्केवारीतील हिश्श्याच्या वादात याचे काम लवकर झाले नाही. २०१८च्या अखेरीस याच्या कामाला महुर्त लाभला तेव्हा या भागातील नागरिकांना खूप आनंद झाला. मात्र त्यांचा हा आनंद आता क्षणिक ठरणार की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण रस्ता होऊन सहा महिने उलटत नाही तोच याची दुर्दशा झाल्याने नागरिक अवाक् झाले आहेत.
मुख्याधिकार्यांची नोटीस
मामाजी टॉकीज समोरून जाणारा रोड हा अवघ्या सहा महिन्यात खराब झाल्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. सूत्रांच्या माहितीनुसार याच्या टक्केवारीरूपी कुरणात आठ जण चरले आहेत. यामुळे याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्यात खड्डे पडल्यामुळे नागरिक पुन्हा एकदा नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या नावाने बोंबा ठोकू लागले आहेत. तर हा जनप्रक्षोभ लक्षात घेता मुख्याधिकार्यांनी संबंधीत ठेकेदाराला याची दुरूस्ती करण्याचे सांगितले. यावर वाळू अभावी हे काम थोडे अपूर्ण राहिल्याचे कारण दाखविण्यात आले. तथापि, नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन, मुख्याधिकार्यांनी संबंधीतांना नोटीसा बजावल्याने याची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. हे काम विहीत अटीनुसार पूर्ण करण्याचे या नोटीसीत म्हटले आहे. यानुसार काम न झाल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
मग रस्ता सुरू का केला ?
या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने नगराध्यक्ष रमण भोळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, मामाजी टॉकीज रोडचे काम अपूर्ण होते. मात्र नागरिकांनी यावरून वाहतूक सुरू करून दिली होती. यामुळे आता याची दुरूस्ती करण्यात येत आहे. आता काम अपूर्ण होते तर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला का करण्यात आला ? मुख्याधिकार्यांना नोटीस बजावण्याची गरज का भासली ? या प्रश्नांची उत्तरे भुसावळकरांना हवी आहेत.
पहा : मामाजी टॉकीज रोडबाबतचा वृत्तांत व मुख्याधिकार्यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ.