धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पोलीस भरतीसाठी आलेल्या हरीयाणातील दोन परिक्षार्थींना ब्लूटूथद्वारे गैरप्रकार करत असल्याचा प्रकार धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईटेक्नाबाईट येथील परिक्षा केंद्रात गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल महिला व पुरुष भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन वेस्टर्न यांच्यावतीने ऑनलाईन परीक्षा घेतले जाते. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईटेक्नाबाईट येथील परिक्षा केंद्रात ऑनलाईन परिक्षा देण्यासाठी हरियाणा राज्यातून आलेल्या आशिष कुलदीप दहिया रा. मोहम्मदाबाद जि. सोनपत आणि दीपक जोगिंदरसिंह रा. हिसार हरीयाणा हे देखील ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी आले होते. गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देत असतांना आशिष दहिया आणि दीपक जोगिंदरसिंह यांनी कानात पिवळसर व काळा पट्टा असलेल्या ब्लूटूथ डिवाइस कानात घालून ऑनलाईन परीक्षांमध्ये गैरप्रकार करण्याचा प्रकार उघडकीला आला. या संदर्भात सचिन अशोक पाटील रा. खोटेनगर, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.