मुंबई प्रतिनिधी । जयदीप राणा या सध्या अटकेत असणार्या ड्रग पॅडरलसोबत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तर ड्रग्जचा खेळ फडणवीस यांच्या इशार्यावरून सुरू असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकांनी ट्विटरवर केलेले एक ट्विट अचानक चर्चेचा विषय बनले. यात त्यांनी एका व्यक्तीसोबत अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करून हा जयदीप चंदूलाल राणार ड्रग पॅडलर असून सध्या कारागृहात आहे. याचे भाजप सोबत नेमके काय नाते आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर हेच ट्विट नवाब मलीक यांनी रिट्विट केले. यात त्यांनी आपण लवकरच नवीन गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले.तरनशांतर्मा यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर टीका केली.
या पत्रकार परिषदेत नवाब मलीक म्हणाले की, जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा २०२० दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत. ते मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहे.
दरम्यान, फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकार्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशार्यावर सुरु आहे. ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे.