रावेर विधानसभेतही भाजपला विजयी करा – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधानसभेतही भाजपाला विजयी करणे आवश्यक आहे,” असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे. “मागील पाच वर्षांत काँग्रेसच्या आमदारांनी कोणतेही उल्लेखनीय काम केले नाही. युवक, शेतकरी, महिलांचे प्रश्न स्थानिक आमदारांनी सोडवलेले नाहीत. तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पुन्हा आपलेच सरकार येणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत भाजपाचा आमदार निवडून देऊन सर्व प्रश्न सोडविण्याची संधी द्या,” असे त्यांनी सांगितले.

रावेर शहरातील अग्रसेन मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना रक्षा खडसे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे सांगितले की, “जरांगे फॅक्टर रावेर मतदारसंघात चालला नाही. संपूर्ण मराठा समाज माझ्यासोबत राहून बहुमताने निवडून दिले. या कार्यक्रमात नंदकिशोर महाजन यांनी राज्य सरकारने युवक, महिला, शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा उल्लेख करताना सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनेने केलेल्या मेहनतीबद्दल गौरवोद्गार काढले आणि विधानसभा निवडणुकीतही असाच परिश्रम करून विजय मिळवण्याचे आवाहन केले.

बुरहानपुर-अंकलेश्वर हायवेवरील सध्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी या रस्त्याची अवस्था मुख्य मुद्दा होता. या मार्गावरील कामासाठी टेंडर पुढील तीन महिन्यांत निघेल, असे आश्वासन मंत्री रक्षा खडसे यांनी दिले आहे. रक्षा खडसे यांनी या प्रकल्पावर स्वतः लक्ष ठेवून रावेर मार्गे हायवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपा नेते नंदकिशोर महाजन, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील, प्रदेश सदस्य सुनिल पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, जिल्हा चिटणीस राजन लासुरकर, धनगर समाजाचे युवानेते संदीप सवाळे, संपर्क प्रमुख उमाकांत महाजन, सी.एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासु नरवाडे यांनी केले.

Protected Content