राज्याच्या राजकारणात आज वेगवान घडामोडींचा दिवस !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वेगवान घडामोडी घडत आहेत. यात आज तीन महत्वाच्या मुद्यांवरून प्रचंड वेगवान घडामोडी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे हे भाजपच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असले तरी अद्याप त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. येत्या दोन दिवसात हा विस्तार अपेक्षित आहे. यासाठी आज आणि उद्या सुप्रीम कोर्टातील निकालावर बरेच काही अवलंबून आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नवी दिल्लीत दाखल होत आहेत. या दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालच शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचे संकेत दिले असून खासदारांचा हा गट आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यामागची पार्श्‍वभूमि स्पष्ट करणार आहे. यात ते पुन्हा एकदा थेट मातोश्रीवर हल्लाबोल करण्याची शक्यता असून यावर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते.

यासोबत, आज सुप्रीम कोर्टात ओबीसी अहवालावरून निकाल येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने बांठीया आयोगाचा अहवाल स्वीकारला होता. यातील तरतुदींवर अध्ययन केल्यानंतर सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी होऊन आजच निकाल येण्याची शक्यता आहे. या निकालावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार की नाही ? हे स्पष्ट होणार आहे. यामुळे आज राज्याच्या राजकारणावर परिणाम करणार्‍या या तीन घटनांकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री बाराच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. त्यांनी बंडखोर खासदारांसह दिल्लतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये डिनरसोबत चर्चा केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत खासदार कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे आदींची उपस्तिी होती. या सर्व खासदरांना घेऊन एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील १२ खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Protected Content