कलम ३७० प्रमाणे राम मंदिराबाबतही धाडसी पाऊल उचलावे – उद्धव ठाकरे

images 1 1

मुंबई, वृत्तसंस्था |“राम मंदिराबाबत केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलावे” असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरासाठी आग्रही आहोत. कोर्टात अंतिम सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्ट योग्यच निर्णय घेईल, मात्र केंद्र सरकारने योग्य पावले उचलावीत”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अयोध्या येथील बाबरी आणि राम मंदिर प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे. त्यासंदर्भातच उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली.

 

“काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले अनुच्छेद ३७० रद्द करण्याबाबत जसा धाडसी निर्णय सरकारने घेतला अगदी तसाच धाडसी निर्णय राम मंदिराच्या निर्मितीबाबत मोदी सरकारने घेतला पाहिजे. राम मंदिराबाबत विशेष कायदा करुन सरकारने हा निर्णय घ्यावा आता आणखी वेळ घालवू नये, आम्ही खूप वेळ वाट पाहिली आहे”अहीही ठाकरे यांनी म्हटले आहे.

आरेबाबतही या पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. नाणारचे जे झाले तेच आरेचे होईल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात आरेतील मेट्रो कारशेडवरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद जुंपण्याची चिन्हे आहेत.

यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखाबाबतही भूमिका स्पष्ट केली. उदयनराजे यांचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या, त्याच अग्रलेखात मांडण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांनाच सांगणार ना? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Protected Content