Home क्राईम फत्तेपुर पोलिसांची मोठी कारवाई ! शेतातील कापूस चोरी करणाऱ्या तिघांना अटक ;...

फत्तेपुर पोलिसांची मोठी कारवाई ! शेतातील कापूस चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
13

फत्तेपुर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील शेतातून कापूस चोरी करणाऱ्या तीन आरोपींना फत्तेपुर पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपींकडून चोरीचा ४० किलो कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईमुळे शेतातील पिकांच्या चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेंगोळा, ता. जामनेर येथील शेतकरी सदानंद कैलास जोशी (वय २५) यांच्या शेतातून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अंदाजे एक ते दीड क्विंटल कापूस चोरीला गेला होता. या घटनेनंतर शेतकरी जोशी यांनी फत्तेपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार १० ऑक्टोबर २०२६ रोजी फत्तेपुर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतातून कापूस चोरीला गेल्याची घटना गंभीरतेने घेत जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. फत्तेपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी विशेष पथक स्थापन करून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जामनेर तालुक्यातील शहापूर येथील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सैयद सोएब एजाज (वय ३१), सय्यद अनस महेमुद (वय १९) आणि शेख मोहम्मद रेहान अब्दुल कादर (वय २७), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही शहापूर, ता. जामनेर येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपींनी संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीचा कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये चार हजार रुपये किमतीचा ४० किलो कापूस आणि दोन लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी यांचा समावेश आहे. या वाहनाचा क्रमांक एमएच २० एफवाय २५४० असा आहे. दोन्ही मिळून एकूण २ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फत्तेपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


Protected Content

Play sound