पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला शिवीगाळ, मारहण करून जीवेठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महिला शौचालयात जात असतांना गावातील सचिन सुदाम लोखंडे हा महिलेच्या मागे दुचाकीने येवून मोठ मोठ्याने हार्न वाजवित होता. त्यानंतर महिलेजवळ येवून तिचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार महिलेने सचिन लोखंडेच्या घरी सांगितले असता सचिनचे भाऊ जितेंद्र सुदाम लोखंडे, संजय सुदाम लोखंडे आणि त्याची आई सुसाबाई सुदाम लोखंडे यांनी महिलेला शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. महिलेने घडलेल्या प्रकारानंतर पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सचिन सुदाम लोखंडे, जितेंद्र सुदाम लोखंडे, संजय सुदाम लोखंडे आणि सुसाबाई सुदाम लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण शिंपी करीत आहे.