१४ जानेवारी पासून महायुती फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील तिन्ही पक्ष महायुती म्हणून आम्ही एकत्रीत निवडणुक लढविणार असल्याची माहिती तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तर १४ जानेवारी पासून तिन्ही पक्षांचे एकत्रीत मेळावे सुरू करण्यात येणार असल्याचेही आज सांगण्यात आले.

मुंबईत आज महायुतीची एकत्रीत पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दादा भुसे, पंकज भुजबळ आदींची उपस्थिती होती. यात प्रारंभी सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, आम्ही लोकसभा निवडणूक एकत्रीतपणे लढविणार असून लवकरच राज्यात एकत्र मेळावे घेणार आहोत. यात पहिला मेळावा १४ जानेवारी रोजी घेण्यात येणार असून याला तिन्ही पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सहाही प्रमुख प्रादेशीक विभागांमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही सध्या राज्यभरात फिरत आहोत, तर आगामी काळात आम्ही एकत्रीतपणे मेळावे घेणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून महायुती ४५ प्लस जागा जिंकणार असल्याचे निश्‍चीत आहे. राज्यातील जनतेला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावे असे वाटत आहे. शक्तीशाली भारताच्या निर्मितीसाठी संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपच्या आणि पर्यायाने महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल असे ते म्हणाले. आम्हाला इतके यश मिळेल की, महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर फक्त नेते असतील, समोर कुणीही नसेल असे ते म्हणाले.

तर, मंत्री दादा भुसे यांनी राज्य सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळणार असल्याचा दावा केला.

Protected Content