बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (दि. ९) पुकारलेल्या एका दिवसाच्या संपामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले असून, राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक किंवा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
संपाची पार्श्वभूमी आणि चर्चेचे प्रयत्न:
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. ९) २४ तासांचा संप जाहीर केला आहे. हा संप टाळण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र आणि संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी कृती समितीमधील संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला, तसेच वीज ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी संप टाळण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

महावितरणचे आपत्कालीन नियोजन सज्ज:
या २४ तासांच्या संप काळासाठी महावितरणने व्यापक आपत्कालीन व्यवस्था उभारली आहे. यामध्ये मुख्यालय आणि क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यालयास कळविण्यात येणार आहे.
पर्यायी मनुष्यबळ आणि साधनसामुग्री उपलब्ध:
संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, तसेच महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी यांची स्थानिक कार्यालये आणि उपकेंद्रे आदी ठिकाणी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणीही करण्यात आली आहे. या सर्वांसाठी वाहन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, रोहीत्र, वीजवाहिन्यांसह इतर आवश्यक साधनसामुग्री विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे. गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून इतर सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बुधवारच्या (दि. ९) रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य:
संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होईल, त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.



