जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार ‘महासंस्कृती महोत्सव’

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच खान्देशमधील स्थानिक कलाकारांना‌ या महोत्सवात व्यासपीठ मिळावे यासाठी स्थानिक‌‌ लोक कलाकारांना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.‌

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात‌ फेब्रुवारी २०२४ या महिन्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या‌ महोत्सवाच्या नियोजनाची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.‌ याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महा संस्कृती’ महोत्सवात आयोजित करावयाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, नागरिकांना सोयीचे ठरतील अशा मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या १५ ते १९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे.‌ चला हवा येवू द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, सारेगमप, इंडियन आयडॉल मधील कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी करावी. महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नीटनेटके व यशस्वी होण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा नियोजनाच्या कामांचा आढावा

यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील मंजूर कामे व प्रलंबित कामांचा आढावा ही पालकमंत्र्यांनी घेतला. आचारसंहितेपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने कामांना गती देण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

मराठा समाज व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षण आढावा

शासनाच्या वतीने आजपासून सुरू असलेल्या मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षणाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचे पालकमंत्र्यांपुढे सादरीकरण केले. सर्वेक्षणात कोणताही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी सर्वेक्षणात सहभागी सर्वेक्षक, प्रगणक व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महावितरणच्या कामांचा आढावा

जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून महावितरण विभागाला देण्यात आलेल्या निधीतून सब-स्टेशन, फिडरच्या कामांना गती देण्यात यावी. कोणत्याही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी‌. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी नंदगाव येथील सब-स्टेशनसाठी शासकीय जागा हस्तांतर आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Protected Content