पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणकडून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत पाटील यांनी महावितरणकडून नागरिकांना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला असून कोणतेही कारण न देता तातडीने उपाय योजना करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु होता. एन रात्रीच्या वेळी सायंकाळी ६ वाजेपासून ते १२ वाजेपर्यंत तसेच पहाटे ३ ते ६ वाजेपर्यंत १५ ते २० वेळा लाईट ये-जा करते. यामुळे नागरिकांच्या घरांमधील विद्युत उपकरणे नादुरुस्त होत होती. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान देखील होत होते. पारोळा शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. एखाद्या भागाला पाणी आले कि तेथील वीज बंद पडते. यामुळे अनेकांना पाणी देखील मिळत नाही. यामुळे शहरवासीय खूप वैतागले होते. ग्रामीण भागात शेती पंपाचा असो वा गावठाणचा रोहित्र एकदा नादुरुस्त झाल्यास १५ ते २० दिवसांपर्यंत मिळत नाही. यामुळे शहरवासीय, शेतकरी यांचेसह ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले होते.
आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेत तातडीची बैठक बोलावली. शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक महावितरणच्या जाचाला पूर्णपणे वैतागले आहेत. येणाऱ्या काळात पारोळा शहराचा वैभवात भर घालणार ब्रह्मोत्सव आहे, अनेक लहान मोठे सन आहेत. यात असाच त्रास सुरु राहिला तर नागरिकांचा रोषाला सामोरे जावे लागले. यासाठी काहीही थातूर मातुर कारणे न सांगता यावर तातडीने उपाय योजना करा व नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने सोडवा अश्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
पाचोरा कार्यकारी अभियंता आर.जे.चव्हाण, उपकार्यकारी अभियंता पी.एम.पाटील, शहर अभियंता जी.एस.मोरे यांनी पारोळा शहरातील विद्युत कनेक्शन असलेल्या रोहित्रावर ग्रामीण भागाचे देखील विद्युत कनेक्शन आहेत. ग्रामीण भागातून अथवा शहरातून एकाचवेळी विद्युत भार अति झाल्याने रोहीत्रावरील कनेक्शन ट्रिपिंग होवून बंद पडतात. यावर उपाय योजनेसाठी आम्ही शहराची विद्युत कनेक्शन एकाच रोहित्रावर व ग्रामीण भागाची वेगळ्या रोहित्रावर कनेक्शन जोडणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यापुढे हा त्रास पूर्णपणे कमी होईल.
तसेच नगरपरिषदेमार्फत विविध भागात पाणी सोडण्याची माहिती घेऊन पाणी सोडण्यात आलेल्या भागात काळजीने लक्ष घालून विद्युत कनेक्शन बंद होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ग्रामीण भागात रोहित्र नादुरुस्त झाल्यास तातडीने रोहित्र उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती उपाय योजना करण्यासाठी प्रयत्नशील त्यावर पण तोडगा निघणार आहे. यासोबतच येणारा ब्रम्होत्सव व लहान मोठ्या सणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. कुठेही विद्युत कनेक्शन बंद होणार नाही याची दक्षता घेत राहू. या सर्व विषयांसह इतर बाबतीत देखील महावितरण तर्फे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले.
या बैठकीला पाचोरा कार्यकारी अभियंता आर.जे.चव्हाण, उपकार्यकारी अभियंता पी.एम.पाटील, शहर अभियंता जी.एस.मोरे, पारोळा ग्रामीण –अभियंता राजनिष श्रॉफ, पारोळा ग्रामीण – अभियंता सचिन बागुल, मंगरूळ कक्ष अभियंता अनुजय धर्माधिकारी, मोहाडी कक्ष अभियंता निसार तडवी, तामसवाडी कक्ष अभियंता जे.पी.चव्हाण हे उपस्थित होते.