मुंबई प्रतिनिधी । आजच्या राजकीय घडामोडी पाहता राज्यात महासेना वा महाशिव आघाडी सरकार सत्तारूढ होणार असल्याची शक्यता बळावली आहे.
आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनमा दिल्यानंतर गतीमान घडामोडी घडल्या आहेत. फडणवीस आणि ठाकरे यांनी अद्याप महायुती तुटली नसल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, दोन्ही बाजूंमधील दुरावा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नियमानुसार सर्वात मोठा पक्ष असणार्या भाजपला उद्या राज्यपाल सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रीत करू शकते. भाजपने बहुमत सिध्द न केल्यास दुसर्या क्रमांकाचा पक्ष असणार्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल. शिवसेनेला राष्ट्रवादी तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच विचीत्र राजकीय समीकरण उदयास येऊ शकते. अर्थात, राज्यात महासेना आघाडी वा महाशिव आघाडी सरकार सत्तारूढ होऊ शकते.
शिवसेना व या पक्षाला पाठींबा दिलेले अपक्ष आमदार, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तिन्हा पक्षांचे सभागृहात एकूण १६२ सदस्य होत असून सत्तेसाठी आवश्यक असणार्या १४५ या मॅजिक फिगरपेक्षा हा आकडा जास्त आहे. यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्रीतपणे सोबत सत्तारूढ होऊ शकतात. येत्या काही दिवसांमध्ये हे समीकरण आकारास येण्याची शक्यता आहे.