
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या महा-रेशीम अभियान 2026 अंतर्गत जळगाव जिल्ह्यात तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने रेशीम रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार केला जाणार असून या जनजागृती रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आले.

रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महा-रेशीम अभियान राबविले असून त्याअंतर्गत तुती लागवड वाढविणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणे यावर विशेष भर दिला जात आहे. या उद्देशाने जिल्हा रेशीम कार्यालयाने रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्हाभर जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा रथ विविध तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व, तुती लागवडीचे फायदे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, जिल्हा रेशीम अधिकारी राकेश जोशी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिरे व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे या शेतीचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी घुगे यांनी तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादन कसे वाढवता येईल, याबाबत मार्गदर्शन करताना संबंधित शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष माहिती देऊन रेशीम शेतीबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



