जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बिलवाडी शिवारात असलेल्या शेतातील हॉटेल अज्ञात चोरट्यांनी फोडून देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत मंगळवारी २९ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पांडुरंग पाटील (वय-३६) रा. बिलवाडी ता. जि.जळगाव यांचे बिलवाडी शिवारातील गट नंबर -६२ मध्ये त्यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मामा-भांजा नावाची परमिट रूम हॉटेल आहे. शेती आणि हॉटेल चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दैनंदिनी प्रमाणे सोमवारी २८ मार्च रोजी दिवसभर काम करून हॉटेल चालून रात्री ११ वाजता हॉटेल बंद करून ते घरी गेले. दरम्यान सकाळी मंगळवारी २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुनील पाटील हे हॉटेलवर आले असता त्यांना हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तपासणी केली असता गल्ल्यातील १ हजार ५०० रूपये आणि देशी-विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्याचे उघड झाले. याबाबत सुनील पाटील यांनी एमआयडीसी पोलीसांत धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी २९ मार्च रात्री अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.