जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्याला ज्या क्षेत्रात काम करावयाचे आहे ते करण्यासाठी उर्मी असली पाहिजे. कामाची दिशा माहिती असली तर आपण योग्य दिशेने प्रवास करतो. कलेच्या क्षेत्रातदेखील उत्तम कलानिर्मिती करावयाची असेल तर त्यासाठी साधना आवश्यक आहे. तरच आपली कलानिर्मिती आशयसंपन्न आणि परिणामकारक होऊ शकते असे मत सुप्रसिद्ध चित्रकार आणि ‘काळ्यानिळ्या रेषा या आत्मकथनाचे लेखक राजू बाविस्कर यांनी व्यक्त केले.
मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. लहानपणापासून मी जो भोवताल पाहिला. माणसं अनुभवली. त्याचे प्रतिबिंब माझ्या चित्रात आहे. अर्थात त्यासाठी अफाट निरीक्षण आणि अपेक्षाविरहित कलासाधना करावी लागली. किंबहुना मी कोणाचीही उसनवारी न करता माझ्या आत रुतून बसलेली माणसं, निसर्ग, प्राणी चितारले. चित्रांनी मला आनंद दिला. अभिव्यक्तीसाठी चित्र मला महत्त्वाची वाटली म्हणून मी त्याकडे वळलो. असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, कलानिर्मिती ही सहजसाध्य गोष्ट नाही त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मी आयुष्यात अनेक चांगली माणसे जोडत गेलो आणि त्यातून मी लेखनाकडे वळलो त्यामुळे आयुष्यात आपल्याला चांगल्या माणसांची बेरीज करता आली पाहिजे त्यामुळे आपण समृद्ध होतो. ‘काळ्यानिळ्या रेषा’ आत्मकथन माझी चित्रे समजून घ्यायला उपयुक्त ठरतेय. याचा मला आनंद आहे. असेही त्यांनी सांगितले. चित्र आणि लेखन या दोन्ही बाबींनी मला भरभरून प्रेम आणि जिव्हाळ्याची माणसे दिली असेही त्यांनी सांगितले. आपल्या कलेला वृद्धिंगत करण्यासाठी वाचन अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. एखादे काम करून सोडून देऊन पुढील कामात स्वत:ला गुंतवून घेतले की अधिकाधिक चागंले काम होते असेही मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी मनोगत व्यक्त केले. चित्र बोलतात. चित्रकार बोलतो. राजू बाविस्कर यांचे निवेदन म्हणजे काळ्यानिळ्या रेषा हे आत्मकथन आहे असे ते म्हणाले. मनातील विचार बाहेर येण्यासाठी वेदनेबरोबर संवेदना महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार डॉ. योगेश महाले यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. विलास धनवे, डॉ. भाग्यश्री भलवतकर, प्रा. विजय लोहार, डॉ. अतुल पाटील, प्रा. गोपीचंद धनगर, प्रा. संजय हिंगोणेकर, प्रा. राजेश सगळगिळे, प्रा. रेणुका झांबरे, प्रा. ज्ञानोबा सोनटक्के, श्री. अमोल देशमुख, प्रफुल्ल पाटील, विजय लुल्हे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.