जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने आगामी दहा वर्षासाठी स्वायत्त घोषित केले असून याचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.
सप्टेंबर २०१८ मध्ये महाविद्यालयाने विद्यापीठास स्वायत्ततेचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव विद्यापीठाने शिफारस करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविला केला. त्यावर आयोगाने पाच तज्ज्ञांची एक समिती गठीत केली. या समितीने अलीकडेच महाविद्यालयास भेट देऊन आपली शिफारस आयोगाकडे केली. त्या समितीच्या अहवालास विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूरी देऊन महाविद्यालयास स्वायत्तता दर्जा प्रदान केल्याचे पत्र पाठवले आहे. हा महाविद्यालयासाठी अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. यू. डी. कुलकर्णी, संस्थेचे शैक्षणिक संचालक प्रा. डॉ.दिलीप हुंडीवाले, प्रा. डॉ. सं. ना. भारंबे व इतर सहकार्यांनी यासाठी प्रयत्न झाले. स्वायत्ततेमुळे आता जून २०१९ पासून महाविद्यालयाचे स्वत:चे अभ्यासक्रम असतील.