परळी, वृत्तसंस्था | स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या (१२ डिसेंबर) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्याच्या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून आले होते, मात्र अवघ्या तीन तासात पोस्टरवर कमळ परत झळकल्याचे दिसून येत आहे.
गोपीनाथ गडावरील मेळाव्यात त्या कोणती वाट निवडणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे सकाळीच संपूर्ण परळीत मेळाव्याचे पोस्टर लावण्यास सुरूवात झाली होती. या मेळाव्याच्या पोस्टरवरून भाजपा आणि कमळ गायब असल्याचे चित्र दिसत होते. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह दिसत नव्हते. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील अद्याप लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण अवघ्या तीन तासांतच भाजपा आणि कमळाचे चिन्ह असलेले पोस्टर्स परळीत झळकले आहेत. त्यामुळे पंकजांच्या निर्णयाबद्दल आडाखे बांधणारे राजकीय धुरंधर पुन्हा वरमले आहेत.
‘तुम्ही नाराज आहात का?’ या प्रश्नावर ‘इतके दिवस थांबला आहात, तर आणखी एक दिवस थांबा’ असे उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले होते. तर ‘गोपीनाथ गड हे राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे कमळ किंवा भाजपाचे नाव लिहिण्याचा प्रश्नच येत नाही’, असे उत्तर खासदार प्रीतम मुंडे यांनी दिले होते. त्यानंतर आता उद्याच्या मेळाव्याचे पोस्टर्स कमळासहीत झळकल्यामुळे पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले आहे की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.