जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात दोन कमी वजनाच्या बाळांना जीवदान मिळाले आहे. त्यांचा जीव धोक्याबाहेर काढून त्यांच्या मातांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात वैद्यकीय यंत्रणेला यश आलेले आहे.
यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवासी असलेले जुबेर खान हे खाजगी वाहनचालक आहेत. त्यांच्या बाळाचे (रहेनुमा) वजन जन्मतः १ किलो होते. त्याला श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. तब्येत खालावत होती. अशावेळी खाजगी दवाखान्यातून बाळाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी २१ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले. नवजात शिशु अतिदक्षता विभागात आल्यावर इन्चार्ज डॉ. वृषाली सरोदे यांनी तपासल्यावर लक्षात आले की, त्याच्या फुफ्फुसाची वाढ पूर्ण झाली नव्हती. सामान्य वातावरणात जंतुसंसर्ग होऊन जीवाला धोका होता. अशावेळी तत्काळ अत्याधुनिक उपकरण व यंत्रणेद्वारे बाळ रहेनुमावर उपचार सुरु करण्यात आले.
बाळाने देखील उपचाराला प्रतिसाद दिला. यावेळी बाळाच्या आई जकियाबी यांना बालशिक्षण देण्यात आले. कांगारू उपचार पद्धती सुरु झाली. यानंतर तब्बल ४३ दिवसांनी २ फेब्रुवारीला बाळाला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी बाळाचे वजन १ किलो ३०० ग्राम भरले होते.
तसेच दुसऱ्या घटनेत, शहरातील असोदा रस्त्यावरील बहिणाबाई चौधरी कॉलनीतील रहिवासी योगेश खैरनार यांच्या कन्येलादेखील वजन कमी म्हणजे १ किलो ४०० ग्रॅम होते. त्यामुळे या बाळाला देखील बाहेरील जंतूसंसर्ग होऊ न देता वेळेवर उपचार करण्याची गरज होती. खाजगी दवाखान्यातून शासकीय रुग्णालयात या बाळाला १९ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. बाळाची आई अश्विनी यांना देखील कांगारू मदर केअर उपचार पद्धतीने बालशिक्षण देऊन बाळाला प्रतिजैविके (अँटीबायोटिक) न देता अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणेद्वारा उपचार करण्यात आले. या बाळालादेखील २ फेब्रुवारी रोजीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज वेळी त्याचे वजन १ किलो ६०० ग्राम भरले.
दोन्ही बाळांवर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, बाल रोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु अतिदक्षता विभाग इन्चार्ज डॉ. वृषाली सरोदे, डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. अविनाश खिलवाडे यांच्यासह अधिपरिचारिका संगीता शिंगारे, शिल्पा कोकाटे यांनी उपचार केले. दोन्ही बाळांच्या परिवाराने शासकीय रुग्णालयाच्या यंत्रणेचे आभार मानले आहेत.