लोकमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त १ मे रोजी लोकमित्र सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.यासाठी निरनिराळ्या क्षेत्रात प्रेरणादायी व आदर्शवत कार्य करणार्‍या विविध गटातील व्यक्ती व संस्थांना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी एका प्रसिद्दीपत्राद्वारे कळविले आहे की,जनसंग्राम बहुजन लोकमंच गेल्या ५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संघटनेच्या १ मे २०१९ रोजी वर्धापनानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्यभरात प्रेरणादायी काम करणार्‍या सामाजिक,सांस्कृतिक, स्वयंसेवी,सहकार, शैक्षणिक,आरोग्य व क्रीडा,संगीत व पाणी बचतीसाठी तसेच इतर क्षेत्रात कार्यरत संस्था,महिला व आदर्श कार्य करणारे शिक्षक, आगळे कार्य करीत असलेले व्यक्ती आणि विविध क्षेत्रात ठसा उमटवून यशस्वी झालेले युवक-युवती यांना यावर्षापासून राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा लोकमित्र सन्मान देण्यात येणार आहे. तर सामाजिक,आरोग्य,शैक्षणिक,सहकार, सांस्कृतिक,क्रिडा,उद्योग-व्यवसाय, महिलांसाठी विशेष कार्य करणार्‍या ३ व्यक्तींना लोकमित्र सन्मान दिला जाईल.

शासकीय-निमशासकीय,खाजगी अनुदानित-विनाअनुदानित के.जी टू पी.जी. ज्ञानदान करणार्‍या शिक्षक आणि प्राध्यापक यात प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-३,उर्दू शिक्षक-३, इंग्रजी,सेमी इंग्रजी किंवा सीबीएससी शिक्षक-३ व महाविद्यालीन प्राध्यापक-१ याप्रमाणे एकूण १० शिक्षकांना लोकमित्र गुरुवर्य पुरस्कार दिला जाईल. शिक्षण क्षेत्रात लोकाभिमुख,नामांकित व आगळे-वेगळे कार्य करणार्‍या शैक्षणिक संस्था अथवा शाळा आणि महाविद्यालय यांना वेगवेगळे २ लोकमित्र गुरुकुल पुरस्कार देण्यात येतील. शेती क्षेत्रात अभिनव प्रयोग करून आदर्शवत ठरलेले पुरुष व महिला शेतकरी,शेती उत्पादनावर आधारित कार्यरत बचतगट आणि शेतीसाठी काम करणारी संस्था किंवा उद्योग यांना प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४ लोकमित्र अन्नदाता पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर सामाजिक जाणिव,सजगता किंवा शोध पत्रकारितेच्या वृत्तांकनाचे ठोस काम केलेल्या उत्कृष्ठ छायाचित्रकार,ग्रामीण वार्ताहर, कॅमेरामन,शहरी पत्रकार व संपादक यांना प्रत्येकाला असे ५ मलोकमित्र पत्रकारफ पुरस्कार देण्यात येतील.

दरम्यान, यासोबत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षा यशस्वी-२,क्रीडा क्षेत्रात नावलौकिक-२,देशसेवेत संरक्षण दलात आणि पोलीस दलात कार्यरत-२, अंध-अपंग व एचआयव्ही बाधितांना मदतगार ठरलेले-२ असे एकूण ८ जणांना लोकमित्र आयडॉल पुरस्कार दिला जाईल.

याप्रमाणे जनसंग्रामच्या वतीने एकूण ३१ सन्मानार्थीना विशेष सरकारी वकील अँड.उज्ज्वल निकम,कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होईल.हा भव्य-दिव्य सन्मान सोहळा कार्यक्रम जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्रामाची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या फैजपूर (ता.यावल) येथे आयोजित करण्याचे नियोजन आहे.वरील गटातील शिक्षक,स्त्री-पुरुष, युवक-युवती, आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांनी आपापले प्रस्ताव येत्या १५ एप्रिल पर्यंत जनसंग्राम बहुजन लोकमंच,एफ-१,तिसरा मजला, गोलाणी मार्केट,जळगाव या पत्त्यावर पाठवावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content