पशूधनाची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जणांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगरात मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर बांधलेले पशूधन चोरणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पिंप्राळा हुडको येथून अटक केली. त्यांच्याकडून दोन बोकड, दोन बकरी यासह दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे. याबाबत रामानंद नगरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख खान उस्मान भिस्ती (वय-३०), सैय्यद रईस उर्फ पावडर रमाजान मणियार (वय २७), नईम रहेमान भिस्ती (वय-२५, सर्व रा. पिंप्राळा हुडको) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारे विजयकुमार नंदलाल कुमावत यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन बोकड व दोन बकऱ्या असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीन नेल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही टोळी पिंप्राळा हुडको परिसरातील असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि विठ्ठल पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत शाहरुख खान उस्मान भिस्ती, सैय्यद रईस उर्फ पावडर रमाजान मणियार व नईम रहेमान भिस्ती या तिघांना ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपणच रिक्षातून हे पशूधन चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले पशूधन व दोन रिक्षा असा एकूण १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल पाटील, पोहेकॉ संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी, जितेंद्र तावडे, इरफान मलिक, पोना हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने केली.

Protected Content