चोपडा, प्रतिनिधी | शहरात यावल रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मादी जातीचे भले मोठे सिंह रोड क्रॉस करताना दिसत असल्याचे सोशल मीडियात व्हायरल झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान त्याबाबत अधिक तपास केला असता असे सिंह खान्देशात आढळतच नाहीत, ते फक्त नागपूर भागात किंवा गुजरात राज्यातच आढळतात. त्यामुळे हा बनावट व्हिडीओ चोपड्याचा नसून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे फॉरेस्टच्या अधिकारी पी.बी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
व्हिडीओत दिसणारा रिलायन्स पेट्रोल पंपसुद्धा चोपड्यातला नाही आणि स्वतः फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज बघितले असता, असा कोणताही प्रकार त्यांना आढळून आलेला नाही. तसेच परिसरातील लोकांना विचारपूस केली असता तसेच परिसरात त्यांच्या काही खुणा तपासल्या असता काहिही आढळून आले नाही. वनविभागाने याभागात गस्तही घातली, मात्र या सिंहीणींचा कुठेही सुगावा लागला नाही. याशिवाय यावल रोडवर रात्रभर वाहतूक सुरू असते, त्यामुळे अशा गजबजलेल्या वातावरणात असे प्राणी फिरुच शकत नाही. त्यामुळे कुणीही घाबरू नये, असे आवाहनही फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी केले आहे. याबाबत रिलायन्स पेट्रोल पंपचे संचालक निपुण गुजराथी यांनीही ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले की, असा कोणताही प्रकार घडलेला नाही.