मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्यातून विधान परिषदेवर निवडून आलेल्या कोकण विभाग व मुंबई या दोन पदवीधर मतदारसंघातील तसेच मुंबई व नाशिक विभाग या दोन शिक्षक मतदारसंघातील सदस्यांची मुदत ७ जुलै, २०२४ रोजी समाप्त होणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरीता भारत निवडणूक आयोगाने दि. ८ मे, २०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीसाठी बुधवार, दि. २६ जून, २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान व सोमवार दि. १ जुलै, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक प्रतिनिधींच्या नावांच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे 11 जून, 2024 पर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. या शिफारसी महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांनी 10 जून, 2024 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 10 जून, 2024 पर्यंत पाठवावीत. जेणेकरून महासंचालनालयाकडून याबाबतची मागणी या कार्यालयाकडे 11 जून, 2024 पर्यंत प्राप्त होऊ शकेल. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 10 जून, 2024 नंतर महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे