जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यातील आरोपी सुरज झंवर याच्या कार्यालयात आढळून आलेले आमदार राजूमामा भोळे यांचे लेटरहेड बनावट असल्याचा खुलासा भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.
याबाबत वृत्त असे की, आमदार राजूमामा भोळे यांचे लेटरहेड सूरज झंवर याच्या कार्यालयात आढळून आल्याची माहिती आज प्रकाशीत झालेली आहे. यावर भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.
आपल्यासाठी हे पत्र जसेच्या तसे सादर करत आहोत. : –
बी.एच.आर. घोटाळ्यात अटकेत असलेले आरोपी सुरज झवर यांच्या कार्यालयामध्ये आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचे कोरे लेटर पॅड सापडून आल्याची बातमी दैनिकात छापून आली आहे. सदर बी.एच.आर. प्रकरणाशी आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचा कोणत्याही अर्थाने व कोणत्याही प्रकाराने संबंध नाही. आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) हे बी.एच.आर. पतपेढी चे ठेवीदार व कर्जदार सुद्धा नाही आहेत. सदर बी.एच.आर. प्रकरणाचा आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे सुता वरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे.
बी.एच.आर. घटनेची चौकशी अनेक दिवसांपासून सुरु आहे. याप्रकरणात अनेक संशयित व्यक्तींना अटक झालेली आहे. तसेच या प्रकरणात या पूर्वी सुद्धा सरकारी शिक्के आढळून आलेले आहे. सरकारी शिक्के बनावट बनू शकतात त्या ठिकाणी आमदारांचे बनावट लेटर पॅड बनवणे सहज शक्य आहे.
झवर यांच्या कार्यालयात सापडलेले आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचे लेटर पॅड शंभर टक्के बनावट आहे. असे कोणत्याही प्रकारचे कोरे लेटर पॅड आमदार कार्यालयाकडून अथवा भाजपा कार्यालयाकडून कोणत्याही व्यक्तीस अथवा संस्थेस दिले जात नाही. आमदार कार्यालयाकडून लेटर पॅड वर मजकूर छापून त्याची आमदार कार्यालयातील रजिस्टर मध्ये नोंद केल्या शिवाय कोणालाही दिले जात नाही.
यामुळे सुरज झवर यांच्या कार्यालयात सापडलेले आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचे लेटर पॅड हे बनावट असून याचा आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्याशी काहीही संबंध नाही, असा खुलासा भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी केला आहे.