भाजपचे गटनेते बदलण्यासाठी महापौरांना पत्र

जळगाव प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्यास बदलण्यात यावे या मागणीसाठी आज महापौर जयश्री सुनील महाजन यांना पत्र देण्यात आले असून या माध्यमातून ऍड. दिलीप पोकळे हे गटनेते तर चेतन संकत हे उपगटनेते असतील अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे गटनेते बदलण्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांच्या परवानगी शिवाय गटनेते बदलता येणार नसल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांना पत्र दिले. यात पक्षाच्या गटनेतेपदी ऍड. दिलीप पोकळे तर उपगटनेतेपदी चेतन संकत यांची नियुक्ती करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ऍड. दिलीप पोकळे, चेतन संकत, कुंदन काळे,  गोकुळ पाटील, किशोर बाविस्कर, उमेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.

 

या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, भाजपचे गटनेते भगत बालाणी यांच्या जागी ऍड. दिलीप पोकळे तर राजेंद्र घुगे पाटील यांच्या जागी चेतन संकत हे उपगटनेते असणार आहेत. मध्यंतरी याबाबत अनेक चर्चा करण्यात आल्या असल्या तरी गटनेते व उपगटनेते बदलण्यासाठी भाजपचे सभागृहातील नेते ललीत कोल्हे यांच्या उपस्थितीत १७ जून रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे २९ सदस्य उपस्थित होते. यात गटनेते व उपगटनेत्यांच्या नावांची निश्‍चीती करण्यात आली होती. याबाबतचे पत्र आज महापौरांना देण्यात आलेले आहे.

 

कुलभूषण पाटील पुढे म्हणाले की, गटनेता व उपगटनेता निवडीबाबतचे पत्र लवकरच विभागीय आयुक्तांना देखील देण्यात आलेले आहे. भाजपचे गटनेते भगत बालाणी यांना घरकूल घोटाळ्यात शिक्षा झाली असून यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झालेली आहे. तसेच आमच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नव्हती. आमचे हक्क हिरावून घेतले जात होते. यामुळे गटनेते व उपगटनेते बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला असून याबाबत पत्र देण्यात आल्याची माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

Protected Content