कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु करा : नाना पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत असून परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश खरीपाची पीके अक्षरशः पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका ही पीके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यांमध्ये थोडासा कापूस आणि भाताचे पीक शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने वाचवले आहे. पण सरकारी खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे खासगी व्यापार्‍यांकडून लूट सुरु आहे. त्यामुळे सरकारने पुरेशी कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु करावीत आणि शेतकर्‍यांची लूट थांबवावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, एकीकडे अस्मानी संकटापासून पीक वाचवणार्‍या शेतकर्‍याला सरकारी अनास्थेला ही तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या मार्‍यात आपल्या पोटच्या लेकरांपेक्षा जास्त काळजीने जपलेले पीक आता पूर्ण नाही पण काही प्रमाणात हाती आले आहे. पण सरकारने अद्याप पुरेशा प्रमाणात कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु केली नाहीत त्यामुळे शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांनाच त्यांचा शेतमाल विकावा लागतो आहे. त्यातच धान खरेदीसाठी घातलेल्या ऑनलाईन नोंदणीच्या अटीमुळे शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. दुर्गम आदिवासी भागातील अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मालाची अद्याप खरेदी झाली नाही. यामुळे सरकारने या ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून तात्काळ पुरेशी केंद्र सुरु करावीत आणि शेतकर्‍यांचा कापूस आणि धान खरेदी करून अडचणींतील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असे नाना पटोले यांनी यात म्हटले आहे.

Protected Content