चोपडा प्रतिनिधी । सातत्याने होणारे कमी होणारे पर्जन्यमान पाहता हतनूर धरणातून दरवाजे उघडून वाया जाणारे पाणी जलपुनर्भरण करण्यासाठी कालव्यात सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केल्यानुसार कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी हतनूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एक पत्र पाठविले. त्यात त्यांनी मागणी केली होती की, चोपडा मतदार संघात गेल्या चार वर्षांपासून होणार्या कमी पर्जन्यमानामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. हतनूर धरणातील पाणी सध्या नदीद्वारे सोडले जात आहे. त्या ऐवजी हे पाणी कालव्याद्वारे सोडल्यास याचा शेतकर्यांना पुनर्भरणासाठी फायदा घेऊन जमिनीची खालावलेली पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे धरणातील पाणी कालव्यात सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती. आ. सोनवणे यांच्या मागणीनुसार हतनूर धरणातून पाणी कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे खालावत चाललेल्या पाण्याच्या पातळीत वाढ होवून शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे.