जामनेर-बोदवड रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर-बोदवड रोडवील ऋषीकेश नर्सरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

 

याबाबत माहिती अशी की,  जामनेर शहरापासून काही अंतरावर बोदवडरोड वरील ऋषिकेश नर्सरीजवळ बुधवारी २ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडतांना ८ वर्षीय नर जातीचा बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच जामनेर वन विभागाचे वनरक्षक विकास गायकवाड, वनकर्मचारी चरणदास चव्हाण, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल प्रशांत पाटील, वनपाल पी. व्ही. महाजन, वनरक्षक संदीप पाटील, वनरक्षक प्रसाद भारुडे, नाकेदार अशोक ठोंबरे, वनमजूर विजय चव्हाण, सुनील पालवे आदींनी धाव घेतली.

 

वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत व्यवहारे यांनी केली. जामनेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. शवविच्छेदनानंतर दफनविधी करणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. दरम्यान, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे १ रोजी बिबट्या विहिरीमध्ये पडला होता. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले, अशाप्रकारे तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यांचा आता मुक्त संचार वाढला असून अन्न व पाण्यासाठी गावाकडे भटकंती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content