Home Cities जळगाव विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक मार्गदर्शनाने युवकांना दिशा

विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक मार्गदर्शनाने युवकांना दिशा


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावचे मा. अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये, तसेच सचिव पवन एच. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑगस्ट २०२५ रोजी धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयात जागतिक युवक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. युवकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. पवन एच. बनसोड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, आजच्या तरुणांना आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांवर कसे यशस्वीरित्या मात करता येईल याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी पोस्को कायदा, रॅगिंगविरोधी कायदे, आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर अडचणींबाबत सखोल माहिती दिली. कायदे समजून घेतल्यास युवक स्वतःचा आणि समाजाचा विकास कसा साधू शकतो, यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमात अॅड. शिल्पा रावेरकर, सहाय्यक लोक अभिरक्षक, यांनी कायद्यांची ओळख, त्यांची अंमलबजावणी आणि तरुण पिढीने त्याचा योग्य वापर कसा करावा याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “कायद्याचे ज्ञान म्हणजे स्वसंरक्षणाचे हत्यार आहे. तरुणांनी सजग राहून आपले हक्क आणि कर्तव्य जाणून घेतले पाहिजे.”

धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य राकेश चौधरी यांनी सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांनी विधी विषयक माहिती घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन केले. यावेळी निलेश चौधरी, उमेश वाणी, आणि यशवंत महाजन सर यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्री. संतोष एस. तायडे आणि आर. व्ही. महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. युवक दिनाच्या निमित्ताने झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ माहितीपर नव्हे, तर भविष्यातील सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला.


Protected Content

Play sound