भडगाव प्रतिनिधी । येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अंतरिम बजेट २०१९ या विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ना.ल. चव्हाण यांनी या विषयावर आपले विचार व्यक्त केले. डॉ. चव्हाण यांनी बजेट संबंधित विविध संकल्पनांची अतिशय सोप्या व साध्या भाषेत मांडणी केली. अंतरिम अर्थसंकल्पातील अनेक बाबींचा आकडेवारीच्या माध्यमातून त्यांनी उलगडा केला. प्रथमदर्शनी हे बजेट नोकरदार वर्गासाठी चांगले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अंतरिम अर्थसंकल्पाच्या बलस्थानांमध्ये बांधकाम क्षेत्रातील भरीव तरतूद, स्त्रिया व शेतकर्यांना लाभदायक, सिंचन व रस्ते विकासासाठी भरीव तरतूद इत्यादी बाबींचा उल्लेख केला. तर या बजेटच्या उणिवा सांगताना ते म्हणाले की, केवळ साडेचार वर्षाचा लेखाजोखा या बजेटमध्ये मांडण्यात आला आहे. तसेच हे बजेट पुढील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सामान्य नागरिक व मागासवर्गीयांसाठी या बजेटमध्ये तितकीशी तरतूद करण्यात आली नाही. त्यादृष्टीने हे बजेट केवळ निवडणूकधार्जिणे बजेट असल्याचे दिसते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड हे होते. तर डॉ. एस. डी. भैसे, डॉ. सी. एस. पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.. व्याख्यानानंतर बजेटवर आधारित उपस्थितांच्या प्रश्नांना डॉ. ना.ल. चव्हाण यांनी समर्पक उत्तरे दिली. उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक यांनी बजेटविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांचे निराकरण डॉ. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमानंतर अर्थशास्त्र विभागाच्या वतीने कृषी विकास या संकल्पनेवर आधारित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी या संकल्पनेवर आधारित विविध भित्तीपत्रके तयार करून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. एस. ए.कोळी, प्रा. जे.जे. देवरे, प्रा. एस. आर. कोळी व प्रा. डी. ए. मस्की आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.