Home क्राईम एलसीबीची ‘सर्जिकल स्ट्राईक’; १३ लाखांसह तिघे गजाआड !

एलसीबीची ‘सर्जिकल स्ट्राईक’; १३ लाखांसह तिघे गजाआड !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास लावून ३ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील तब्बल १३ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. या गुन्ह्यात चोपडा आणि जळगावमधील आरोपींचा समावेश असून, धुळ्याचा कुख्यात गुन्हेगार साहिल शहा हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

घटनाक्रम आणि तपास:
यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला समांतर तपासाचे आदेश दिले. या मोहिमेसाठी एलसीबीने चार विशेष पथके तयार केली होती. तपास पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे विणले. अखेर, पोहेकॉ. विलेश सोनवणे यांना मिळालेल्या ठोस माहितीनुसार, हा गुन्हा चोपडा व जळगावमधील पाच जणांच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींची धरपकड आणि मुद्देमाल जप्त:
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून जुबेर खान हमीद खान (वय ३३, रा. चोपडा), शोएब शेख इस्माईल शेख (वय २५, रा. हुडको, जळगाव) आणि इस्माईल खान शेर खान (वय २५, रा. हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाकी वर्दीचा हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या वाटेला आलेली १३ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

कुख्यात सूत्रधार फरार:
या गुन्ह्याचा मुख्यसूत्रधार साहिल सत्तार शहा (रा. धुळे) आणि अनस शहा हे दोघे फरार आहेत. साहिल शहा हा धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोडी, अंमली पदार्थ विक्री, वाहन चोरी आणि मंदिर चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथके सध्या धुळे व परिसरात या फरार आरोपींचा शोध घेत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि सोपान गोरे, पोउपनि जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे व त्यांच्या पथकाने केली आहे.


Protected Content

Play sound