जळगावातून दोन दुचाकी लंपास करणारे एलसीबीच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोस्टल कॉलनीतून दुचाकीची चोरी करून भुसावळ शहरात दुचाकीने फिरत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्या ताब्यातील दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, आबूस परवेज तडवी वय 35 रा. न्यु पोस्टल कॉलनी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते ब्रोकरचे काम करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची बजाज कंपनी दुचाकी (एम.एच. 17 बी.टी. 0092) व यामाहा कंपनीची मोफेड (एम.एच. 19 पी.2358) या दोन्ही दुचाकी घरासमोरील कुंपनात उभ्या केल्या होत्या. 19 ऑगस्ट रोजी ते सकाळी 8.30 वाजता घराबाहेर आले. तेव्हा त्यांना त्यांच्या सदरच्या दोन्ही दुचाकी आढळून आल्या नाहीत. आबूस तडवी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

जळगावात चोरी केलेल्या दुचाक्या ह्या भुसावळात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली. स्था. गु. शा. पथकातील कर्मचारी स.फौ. अशोक महाजन, पो.हे.का. शरीफ काझी, पो.हे.का. सुरज पाटील, पो.हे.का. राजेंद्र पवार, पो.ना. इद्रीस खान, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड , पोकाँ रणजित जाधव यांचे पथक भुसावळात दाखल झाले. शहरातील मुख्य रस्त्यावर सापळा रचून पोलीसांनी संशयित आरोपी रोलँड मथ्यास आणि स्वप्निल सोनवणे दोन्ही रा. रेल्वे फिल्टर हाऊस भुसावळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील चोरीच्या दोन्ही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content