चाळीसगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस जाहिरात बाजीने साजरा न करता सामाजिक उपक्रमांद्वारे करण्यात येणार असून जिल्ह्यात ई- श्रमिक अभियानाला सुरुवात करण्यात आली, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस येत्या १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रपरिषदेत त्यांनी पंतप्रधान यांचा वाढदिवस हे जाहिरात बाजीने न साजरा करता सामाजिक उपक्रमांद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ई- श्रमिक लेबर कार्ड नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात जळगाव मतदार संघातील जास्तीत जास्त कामगारांनी नोंदनी करण्याचे आवाहन खासदार यांनी केले आहे. या अभियानाअंतर्गत आता सुमारे १५२ कामगारांना आपले आयुष्य आनंददायी करता येणार असून भविष्यात केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने २६ ऑगस्ट रोजी असंघटित कामगारांसाठी ई- श्रमिक लेबर कार्ड योजनेला प्रारंभ केली आहे. याच धर्तीवर खासदार उन्मेष पाटील यांनी या योजनेला जिल्हाभरात शुभारंभ केली आहे. या योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुधन व्यवसायक, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, हातकाटा विक्रेते, बांधकाम कामगार, दुग्धव्यवसायक, रिक्षा चालक, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, इलेक्ट्रिशन, मच्छीमार, बिडी कामगार, चामडे विक्रेते व शिवन कामगार, मिठ उत्पादक कामगार, वीट भट्टी कामगार, गृहकाम करणार्या महिला, वृत्तपत्र विक्रेते, शिवन कामगार, रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला वा पुरुष, दुग्ध विक्रेते, प्रवासी कामगार आदींना घेता येणार आहे. सदर योजनेत नोंदणीसाठी आधारकार्ड, बॅंक खाते व मोबाईल नंबर अनिवार्य असणार आहे.