
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा’त राज्यस्तरीय सामाजिक आणि राजकीय पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. यंदाचा ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती राजकीय पुरस्कार’ जनता दलाचे नेते तथा मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना, तर ‘सामाजिक (पुरोगामी) पुरस्कार’ माजी आयआरएस अधिकारी आणि जलसंवर्धन तज्ज्ञ उज्वलकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ आणि साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ ऑगस्ट रोजी या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील आणि सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे या राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारलिंगी समाजाच्या अभ्यासक शमिभा पाटील होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांवरून येणाऱ्या प्रत्येक माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले. संदर्भासाठी ग्रंथालयाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी स्वतःची वैचारिक बैठक मजबूत करावी. देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी ‘Gen Z’ पिढीवर असून, विद्यार्थ्यांनी विवेकातून परिवर्तन घडवावे, असे त्यांनी सांगितले.
द्वेषापेक्षा संवाद, अफवांपेक्षा सत्याची पडताळणी, व्यक्तीपूजेपेक्षा विचार आणि विभाजनापेक्षा बंधुत्वाला महत्त्व द्यावे, असा संदेशही शमिभा पाटील यांनी दिला. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये आचरणात आणल्यास संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्कारमूर्ती उज्वलकुमार चव्हाण यांनी महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २३८ गावांमध्ये जलसंवर्धनाच्या माध्यमातून झालेल्या कामांचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसे तयार केली, हे त्यांचे मोठे योगदान होते. त्याचप्रमाणे पाण्याच्या प्रश्नावर गावागावांत काम करणारी माणसे तयार करणे ही आपली प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय लावावी, जीवनमूल्यांसाठी वारकरी संप्रदायातील हरिपाठ ऐकावा तसेच शाळांनी विपश्यना केंद्र सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राजकीय पुरस्काराचे मानकरी मिलन म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा तसेच जनसामान्यांशी असलेल्या नात्याचा गौरव करत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
समारोहाच्या निमित्ताने आयोजित ‘साथी संदेश वक्तृत्व स्पर्धे’त राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत संभाजीनगर येथील प्रशांत चिंतामण बेले याने प्रथम क्रमांक पटकावला. मालेगाव येथील समृद्धी संजय मोरणकार हिने द्वितीय, जळगाव येथील रुपेश जयंत पाटील याने तृतीय, तर अमळनेर येथील कल्याणी संदीप पाटील हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्राध्यापक राजेंद्र देशमुख, कविवर्य बी. एन. चौधरी आणि संजय नेरकर यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, किरण पाटील, डॉ. शकील जलालोद्दीन शेख, भास्कर बोरसे, मगन पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, अनिता पाटील, सुनील पाटील यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर, जे. एस. पाटील, मोनिका पाटील आणि शारदा उंबरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मानले.



