जळगाव प्रतिनिधी | येथील गोदावरी फाऊंडेशन संचलीत हरीभाऊ जावळे कॉलेज ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नोलॉजीमध्ये आज दिवंगत हरीभाऊ जावळे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून दिवंगत माजी खासदार आणि आमदार हरीभाऊ जावळे यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी त्यांच्या नावाने हरीभाऊ जावळे कॉलेज ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नोलॉजी हे महाविद्यालय सुरू केले आहे. यंदापासून यात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
आज दिवंगत माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त कॉलेजमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, उपाध्यक्षा डॉ. वर्षा पाटील, सचिव डॉ. केतकी पाटील, गोदावरी अभियांत्रीकीचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. पाटील, हरीभाऊ जावळे कॉलेज ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नोलॉजीचे प्राचार्य पुनीत बसोन, प्रा. रोहित अग्रवाल, प्रा. रेवा रिसबुड, प्रा. व्ही. व्ही. चौधरी, प्रा. शफीक अन्सारी, ग्रंथपाल नकुल घाडगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. डॉ. उल्हासदादा पाटील यांनी हरीभाऊंच्या स्मृतींना उजाळ देत त्यांच्या उदात्त जीवनकार्याची माहिती दिली. गोदावरी अभियांत्रीकीचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.