Home Cities जळगाव जागतिक ‘पॉवर गेम’मध्ये भाषा वैविध्य महत्वाचे – ज्ञानेश्‍वर मुळे

जागतिक ‘पॉवर गेम’मध्ये भाषा वैविध्य महत्वाचे – ज्ञानेश्‍वर मुळे

0
37

जळगाव प्रतिनिधी । जागतिक पातळीवरील ‘पॉवर गेम’मध्ये भाषा वैविध्य हे महत्वाचे असून भारताची हीच खरी महत्वाची ताकद असल्याचे प्रतिपादन करून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्‍वर मुळे यांनी मातृभाषेतील शिक्षणाची महत्ता अधोरेखीत केली. ते ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

माजी परराष्ट्र सचिव, विद्यमान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा सिध्दहस्त लेखक म्हणून ख्यातनाम असणारे ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले की, माझ्यासारखा ग्रामीण भागातील विद्यार्थी विदेश सेवेत यशस्वीपणे सेवा करू शकला याचे कारण म्हणजे देशाच्या कान्याकोपर्‍यात पोहचलेली लोकशाही आणि शिक्षण कारणीभूत आहे. सेवा काळात सामाजिक जाणीव टिकवता आली हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी सातत्याने मराठी भाषेतील शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. या अनुषंगाने विचारणा केली असता ते म्हणाले की, मराठी ही अगदी जागतिक परिप्रेक्षातही मोठी भाषा आहे. आपण जगातील दहाव्या क्रमांकाचा भाषा समूहाचे घटक आहोत. यामुळे मराठी नष्ट होण्याचा धोका नाहीच. तथापि, अनेकांना इंग्रजीमुळे नोकर्‍या मिळत असल्याचा गैरसमज असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. आज बदलत्या वातावरणात म्हणजेच जागतिक पॉवर गेममध्ये भाषा वैविध्य महत्वाचे असून भारताची हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण आपल्या भाषेविषयी सजग असावे आणि यात तंत्रज्ञान विषयक ज्ञान यावे ही अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

ज्ञानेश्‍वर मुळे यांना पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून गौरविण्यात आले आहे. याबाबत माहिती देतांना ते म्हणाले की, आधी पासपोर्टची प्रक्रिया ही अतिशय किचकट आणि वेळखाऊ होती. यात आवश्यक ते बदल करून जिल्ह्यात किमान एक खरं तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक अशी पासपोर्ट केंद्रे देशभरात उभारण्यात आली आहेत. अर्थात, फक्त केंद्रच न वाढविता लोकांना येणार्‍या अडचणींवर मात करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे पासपोर्ट प्रक्रिया ही एजंटमुक्त होऊन कुणीही अगदी स्मार्टफोनवरून याला मिळवू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत विधवा, विधूर, घटस्फोटीत आदींसाठी असणार्‍या जाचक अटी काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सेवेतील मराठीचा टक्का कमी असल्याबाबत विचारले असता, ज्ञानेश्‍वर मुळे म्हणाले की, अलीकडच्या काळात सुदैवाने मराठी तरूण प्रशासकीय सेवेत मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र फक्त प्रशासकीय सेवेतील वाटा महत्वाचा नाही. स्वातंत्र्यपूर्ण काळात महाराष्ट्राने देशाला विचार दिला आहे. आता तसे होतांना दिसत नाही. देशाला नवीन विचार देणारे राज्य अशी ओळख मिळवणे हे त्याहून महत्वाचे असल्याचे ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आवर्जून नमूद केले.

पहा : विविध विषयांवर ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त केलेले विचार.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound