नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी ताठे यांना ताब्यात घेतले आहे. तेलंगाणाच्या दामेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यात जूनमध्ये अमली पदार्थ तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात पंचवटी पेठफाटा परिसरातून संशयित लक्ष्मी ताठे व त्यांचा मूलगा विकास ताठेला तेलंगणाच्या वारंगल आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी अटक केली. दुपारी तेलंगणा पोलिस या मायलेकाला घेऊन पंचवटीतून रवाना झाल्याची माहिती आहे. ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून शिंदेंसेनेत त्या मागील काही महिन्यांपासून नाहीत.
या प्रकरणात बीड, अहमदनगर येथून दोन तस्करांना अटक केली. त्यांच्या चौकशीत हा गांजाचा साठा नाशिकच्या पंचवटी भागात या ताठे नामक महिलेकडे पोहोच केला आणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन लक्ष्मी व विकास या दोघांना ताब्यात घेतले. यापूर्वीही 2018 व 2019 साली नाशिकमध्ये गुन्हे शाखांच्या पथकांनी गांजा तस्करीमध्ये लक्ष्मी ताठे व अन्य संशयितांना अटक केली होती.