शेगावात चैतन्याला उधाण : प्रकट दिनानिमित्त लक्षावधी भाविक दाखल

शेगाव-अमोल सराफ | संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आज संतनगरी शेगावात भक्तीचा मळा फुलला असून लक्षावधी आबालवृध्द भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

आज संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून गत रविवारपासून श्री संस्थानमध्ये सुरु असलेल्या महारुद्रस्वाहाकारयागाची सोमवारी सकाळी दहा वाजता पूर्णाहूती व अवभूतस्नान होईल. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्रीच्या प्रकटदिनानिमित्त कीर्तन होणार आहे.

आज दुपारच्या मध्यान्हसमयी श्रींचा जन्मोत्सव साजरा होणार आहे, यावेळी मंदिरात भाविकांकडून पुष्पवृष्टी होईल. श्रीची महाआरती होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शनिवारी प्रकटदिनाच्या पूर्वसंध्येलाच भाविकाची संतनगरीत गर्दी झाली आहे. भाविकांनी उशिरा रात्रीपर्यंत संतनगरीत हजेरी लावून दर्शनबारीत श्री गजानन विजय ग्रंथाचे भाविकांनी पारायण केले.

दरम्यान, कालच राज्यभराच्या कानाकोपर्‍यातून ७०० पेक्षा जास्त दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची परिक्रमा निघून संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा होणार आहे

दरम्यान, भक्तांना दर्शनाची सोय व्हावी याकरता मागील २४ तासापासून भाविकांकरता अखंड मंदिर खुले आहे तरी देखील जवळपास सध्या पाच तासापेक्षा जास्त श्री समाधी दर्शन एक तासापेक्षा जास्त श्रीमुख दर्शन करता भाविकांना लागत आहे जवळपास एक किलोमीटर पेक्षा जास्त भाविकांची रांग दर्शनाकरता लागली आहे. संत नगरी शेगावात गण गण गणात बोतेचा गजर झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content