ब्रेकींग : प्रत्येक नगरपालिकेतील नगरसेवकांच्या जागा वाढणार !

मुंबई प्रतिनिधी | आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, प्रत्येक ठिकाणी नगरसेवकांच्या १७ टक्के जागा वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. नगरविकास खात्याने दाखल केलेल्या या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या अंतर्गत आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये नगरसेवकांच्या जागा १७ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे. ही निवडणूक २०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार होणार असली तरी गेल्या दहा वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा जागा वाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या निर्णयानुसार आता प्रत्येक नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकांमध्ये विद्यमान जागांमध्ये १७ टक्के जागांची वाढ होणार आहे.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्यांप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

महानगरपालिकांमध्ये 3 लाखापेक्षा अधिक व 6 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 76 व अधिकत्तम संख्या 96 पेक्षा अधिक नसेल.

6 लाखापेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 96 व अधिकत्तम संख्या 126 पेक्षा अधिक नसेल.

12 लाखापेक्षा अधिक व 14 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 126 व अधिकत्तम संख्या 156 पेक्षा अधिक नसेल.

24 लाखापेक्षा अधिक व 30 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 156 व अधिकत्तम संख्या 168 पेक्षा अधिक नसेल.

30 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 168 व अधिकत्तम संख्या 185 पेक्षा अधिक नसेल.

अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 40 व अधिक संख्या 75 हून अधिक नसेल.

ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37 हून अधिक नसेल.

क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 20 व अधिक संख्या 25 हून अधिक नसेल.

Protected Content