जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेला २० जूनपासून जळगावच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात होत असून यासाठी महाराष्ट्रातील २४ जिल्हा संघांचा सहभाग निश्चित झाला असून एकूण चार गटात या स्पर्धा खेळवल्या जाणार आहे.
जळगाव जिल्ह्याचा ब गटात समावेश असून जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना ठाणे सोबत होणार असून या गटात भंडारा,सांगली, नाशिक, पुणे यांचा समावेश आहे. तर “अ” गटात कोल्हापूर, बीड, अहमदनगर, वर्धा ,परभणी, अमरावत, “क” गटात नागपूर, धुळे, वाशिम, लातूर, सातारा व बुलढाणा. “ड” गटात सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, गोंदिया, पालघर व मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच त्यात दोन महिलांचा समावेश
स्पर्धा यशस्वीतेसाठी बॉम्बे रेफ्री असोसिएशन द्वारे मॅच कमिशनर म्हणून धनराज मोरे मुंबई तर पंच म्हणून महिला जिगनशाह दवाने व स्नेहल मांजरेकर (मुंबई), सतीश शिंदे व हर्षल राऊत (कोल्हापूर), कलीम मोहम्मद व सौरभ गोरे (नागपूर), तर रमिझ शेख (अमरावती ) व नरेश शिंदे (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हा महिला संघाचा सुद्धा सहभाग
जळगाव जिल्ह्याचा महिलांचा संघ सुद्धा यात सहभागी होत असून त्यांचा पहिला सामना २० जून रोजी सकाळी 9 वाजता ठाणे जिल्हा सोबत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे खेळवला जाणार आहे. जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख, यांनी जळगावच्या क्रीडारसिकांनी २० ते २५ जून या स्पर्धांचा आस्वाद घ्यावा असे आव्हान केले आहे.