तिनही पोलीसांना न्यायालयीन कोठडी; कारवाईचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार

जळगाव प्रतिनिधी | न्यायालयात हजर करण्यासाठी गेलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह कारागृहातील दोन बंदी आरोपींनी शहरातील हॉटेलमध्ये दारू पिऊन दोन्ही बंदी यांनी तुकारामवाडीतील एका तरूणाला मारहाण केली होती. याप्रकरणी दोन्ही बंदी आणि सोबत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायलयात हजर केले असता तिघे पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीसांनी पोलीस कर्मचारी सुरेश सपकाळे, मुकेश पाटील, गोरख पाटील या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतरच्या कारवाईचे अधिकार वारिष्ठांना असल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, कारागृहातील बंदी चेतन आळंदे व लखन मराठे या दोघांनी न्यायालयात तारखेवर आलेल्यानंतर पोलीस सोबत असतांना तुकारामवाडीत जावून अरुण गोसावी याला पोलीसांसमक्ष मारहाण करून त्याला खासगी कारमध्ये डांबून ठेवून कारागृहाकडे सोडले होते. याप्रकरणी जखमी अरुण गोसावी यांच्या फिर्यादीवरून कारागृहातील दोन्ही बंदी व त्यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी सुरेश सपकाळे, मुकेश पाटील, गोरख पाटील या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री एमआयडीसी पोलीसांनी पोलीस कर्मचारी सुरेश सपकाळे, मुकेश पाटील, गोरख पाटील या तिघांना अटक केली आहे.

ओळख परेडसाठी तिघांना न्यायालयीन कोठडी
दोन्ही बंदींनी अरुण गोसावी याला मारहाण केल्यानंतर त्याला खासगी कारमध्ये डांबून ठेवून त्याला कारागृहाकडे नेले होते. हा सर्व प्रकार बंदीसोबत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांसमक्ष घडलेला होता. दोन्ही बंदीसोबत पोलीस कर्मचार्‍यांनीही मद्यप्राशन केले होते. या तिन्ही पोलीस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आल्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी ओळख परेडसाठी तिन्ही कर्मचार्‍यांना न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार तिन्ही कर्मचार्‍यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Protected Content