Home Cities जळगाव आमोदे येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे ‘श्रमसंस्कार’ शिबिर

आमोदे येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे ‘श्रमसंस्कार’ शिबिर


आमोदे ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकातर्फे आमोदे येथे आयोजित सात दिवसीय विशेष ‘श्रमसंस्कार’ शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. ग्रामीण विकास, शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन आणि व्यक्तिमत्त्व विकास या विविध विषयांवर आधारित उपक्रमांमुळे शिबिराला ग्रामस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराची दररोजची सुरुवात शिस्तबद्ध पद्धतीने योगासन, प्राणायाम व ध्यानधारणा यांसह करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना गीत, विद्यापीठ गीत आणि राष्ट्रगीताच्या पठणाने देशभक्ती व शिस्तीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्यात आली. सकाळी प्रभातफेरी काढून ‘पाण्याचे पुनर्भरण – जीवनाचे संवर्धन’, ‘स्वच्छ सृष्टी’ आणि ‘सिग्नल पाळा – जीवन वाचवा’ यांसारखे सामाजिक संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.

या सात दिवसीय शिबिरात कृषी व सामाजिक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. करण बनसोडे यांनी सेंद्रिय खत उत्पादनाविषयी माहिती दिली, तर प्रा. एन. बी. सदार यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे व मर्यादा यांचे सविस्तर विवेचन केले. प्रा. एस. एन. पाटील यांनी पीक विमा योजनांचे महत्त्व पटवून दिले. जैविक घटकांवर प्रा. सायली विधाते यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मोनिका भावसार यांनी शाश्वत शेती व मातीतील सेंद्रिय कर्ब याविषयी माहिती देत जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. प्रीती दातीर यांनी महिला सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास आणि एसडब्ल्युओटी (SWOT) विश्लेषणाचे महत्त्व यावर प्रभावी व्याख्यान दिले.

समारोप कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. सी. तायडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशनचे प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे दूत बनून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक ज्ञान पोहोचवावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. बी. एम. गोणशेतवाड यांनी ‘विकसित भारत’ या संकल्पनेविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून दिली.

शिबिराच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर. डी. चौधरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रीती दातीर तसेच उद्यानविद्या तंत्रज्ञ प्रा. करण बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या सांगतेवेळी डॉ. प्रीती दातीर यांनी सर्व मान्यवर, ग्रामस्थ व स्वयंसेवकांचे आभार मानले.

 


Protected Content

Play sound