Home धर्म-समाज दहिगावच्या प्रति पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा

दहिगावच्या प्रति पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा

0
3

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील परिसरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त शनिवार, २५ जुलै रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ११ क्विंटल साबुदाणा फराळ, मोफत केळी व चहा वाटप, रक्तदान शिबिर, पूजा-अर्चा आणि भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार असून हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सन १९९८ मध्ये सुमारे २५ लाख रुपये लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले हे भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंचक्रोशीतील श्रद्धास्थान मानले जाते. अनेक वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. यावल तालुक्यासह जळगाव आणि परिसरातील हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. दिवसभर भजन, भारूड, कीर्तन आणि हरिनाम संकीर्तनाने मंदिर परिसर भक्तिरसात रंगून जातो. मंदिर उभारणीसाठी संस्थेचे ट्रस्ट अध्यक्ष सुरेश पाटील, हेमराज महाजन, कै. धागो पाटील, कै. प्रकाश सोनार, आत्माराम महाजन, श्रीपत महाजन यांच्यासह अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या या मंदिराने आज परिसरातील प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यंदाच्या आषाढी एकादशी उत्सवानिमित्त सकाळी ५ वाजल्यापासून नवविवाहित नऊ जोडप्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, होम-हवन व पूजाअर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक विधी आणि यात्रोत्सवाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. भाविकांसाठी ११ क्विंटल साबुदाणा फराळाचे आयोजन करण्यात आले असून विविध सेवाभावी संस्थांकडून मोफत केळी व चहा वाटप करण्यात येणार आहे. स्वाभिमानी ग्रुपच्या वतीने सुमारे १०० लिटर दूध खरेदी करून भाविकांना मोफत चहाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जळगाव येथील रेड प्लस संस्था रक्तसंकलनासाठी उपस्थित राहणार आहे.


Protected Content

Play sound