Home उद्योग स्मार्ट मीटरला कुसुंबेकरांचा ठाम नकार, महावितरणकडे निवेदन

स्मार्ट मीटरला कुसुंबेकरांचा ठाम नकार, महावितरणकडे निवेदन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात जळगाव तालुक्यातील कुसुंबे गावात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ग्रामस्थांच्या हजारो तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कुसुंबे ग्रामपंचायतीने स्मार्ट मीटरला जाहीर विरोध दर्शविला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव मंजूर करून तो महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला असून, गावकऱ्यांच्या समस्या दूर न करता कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवू देणार नसल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

ग्रामस्थांकडून सातत्याने विजेचा लपंडाव, अनियमित वीजपुरवठा आणि अवाजवी वाढीव वीजबिलांबाबत तक्रारी येत असल्याने ग्रामपंचायतीने हा ठराव घेण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत होईल, याची कोणतीही हमी नसताना ग्राहकांवर आर्थिक भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच समस्यांनी ग्रस्त असलेल्या ग्रामस्थांवर नव्या अडचणी लादल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आलेल्या संबंधित ठेकेदारांच्या प्रतिनिधींनी काही ग्राहकांना ‘तुमच्या मीटरमध्ये छेडछाड आहे’ अशी भीती दाखवून पैसे उकळल्याचे प्रकार समोर आल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून, याला तातडीने आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीच्या ठरावात महावितरणने सर्वप्रथम गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, नवीन वीजखांब उभारणे आणि केबलचे अपूर्ण काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. मूलभूत सुविधा पूर्ण न करता स्मार्ट मीटर बसविणे म्हणजे समस्यांवर उपाय न करता केवळ खर्च वाढविण्याचा प्रकार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

या संदर्भातील निवेदन महावितरणचे कनिष्ठ अभियंता सावदेकर यांना देण्यात आले. यावेळी सरपंच पती अशोक पाटील, उपसरपंच चंद्रकांत पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य रामदास कोळी, भूषण पाटील, विशाल राणे, प्रमोद घुगे आदी उपस्थित होते. सर्व सदस्यांनी एकमताने ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहत स्मार्ट मीटरविरोधात ठराव मंजूर केला.


Protected Content

Play sound