कुरंगी प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या मोहाडी परीसरात विजांच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. कुरंगी येथून जवळ असलेल्या मोहाडी येथील शेतकऱ्याने साठवून ठेवलेला चाऱ्यावर विज पडल्याने चारा जळून खाक झाल्याची घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. जळून खाक झालेल्या चाऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवारी दिवसभर उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. चोपडा आणि पाचोरा तालुक्यातील ठिकठिकाणी तुरळक प्रमाणावर पावसाने हजेरी लावली. दरम्यान पाचोरा तालुक्यातील कुरंगी आणि परीसरात रात्री 10 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटीसह वादळी वाऱ्याला सुरूवात झाली. मोहाडी शिवारात शेतकरी रना हरी पवार यांच्या मालकिचा गुरांसाठी राखून ठेवलेल्या चाऱ्यावर विज पडल्याने संपुर्ण चारा जळून खाक होऊन 90 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरीकांना रात्रीची आग विझविण्याचा शर्तीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आल्याने संपुर्ण चारा जळून खाक झाला. सकाळी सरपंचा आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान अद्यापपर्यंत शासनाकडून घटनेचा पंचनामा झालेला नाही. दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकरी पवार यांची झाली असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.