जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना-उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते अलीकडेच पिंप्राळ्यातील भव्य शिवस्मारकाचे भूमिपुजन झाले होते. यानंतर विराट सभादेखील झाली होती. यात उध्दव ठाकरे यांनी तत्कालीन महापौर आणि उपमहापौरांच्या कामांचे कौतुक केले होते. यात प्रामुख्याने कुलभूषण पाटील यांनी ज्या प्रकारे पिंप्राळा परिसरात विकासकामे केलीत, यासोबत भव्य शिवस्मारकाची उभारणी केली ! त्याचे ठाकरेंनी तोंड भरून कौतुक केले होते.
या कार्यक्रमानंतर उध्दव ठाकरे यांनी कुलभूषण पाटील यांना मुंबईला बोलावले होते. या अनुषंगाने शुक्रवारी पाटील यांनी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने जळगाव शहरातील विविध कामे, सध्याची राजकीय स्थिती आदींसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई आदी नेत्यांची देखील उपस्थिती होती. तर कुलभूषण पाटील यांच्या सोबत शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.