अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या वर्षभरापासून चोपडा आगाराची एस. टी. बस मारवड, कळमसरे, शहापूर मार्गे चोपडा-नंदुरबार या मार्गावर सुरू आहे. या बसने प्रवाशांना सातत्याने चांगली आणि सुरळीत सेवा पुरवल्याबद्दल बसचे चालक आणि वाहक यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला.
एसटी महामंडळाचा वर्धापनदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (१९ फेब्रुवारी २०२४) या निमित्ताने चोपडा-नंदुरबार बससेवा सुरू करण्यात आली होती. वर्षभर या बसने वेळापत्रकाचे योग्य पालन करत प्रवाशांना चांगली सेवा दिली, त्यामुळे कळमसरे, शहापूर आणि परिसरातील नागरिकांनी बसचे चालक आर. आर. पाटील आणि वाहक ए. एस. सैय्यद यांचा सत्कार केला. कळमसरे ग्रामपंचायतीचे सरपंच जगदीश निकम, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील आणि ग्रामस्थांनी दोघांना शाल, श्रीफळ आणि हार देऊन सन्मानित केले.
या बसचे चालक राजेंद्र पाटील यांची नियमितपणे या बसवर नियुक्ती असल्यामुळे ते वेळेचे पालन करतात आणि बस नेहमी वेळेवर धावते. कळमसरे आणि परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासून बस कळमसरे मार्गे सुरू करण्याची मागणी होती. चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ही बससेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे कळमसरे परिसरातील प्रवाशांनी चोपडा आगाराचे आभार मानले आहेत.
सत्कार समारंभाला ग्रामपंचायत सदस्य दिनकर पारधी, आधार कोतवाल, प्रदीप महाजन, विठ्ठल नेरकर, रामलाल महाजन, गुलाबसिंग पाटील, जितेंद्र पाटील आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.